Wednesday, 23 March 2022

गाव मागे सूटताना...!




काय घडतं तुम्ही एक गाव सोडता..? 
जागा तेवढी बदलते, पण तुम्ही..? 
तुम्ही तेच असता, आधीही अन् आताही. 
माणसे भले बदलत असतील आजूबाजूचे
पण तुम्ही माणूस इथे हि तेच असता..! 

आधीच्या लोकांना परिचीत असलेले, 
तुमचे गुण-अवगुण इथे नव्याने जाणवतात. 
आधी कुणी केलेली प्रशंसा नव्याने भेटते
तुमचा एखादा दुर्गुण पुन्हा ऐकायला मिळतो
फार काही बदलत नाही तुम्ही तेच असता..! 

बाह्यपक्षी खरंच फार काही बदलत नाही, 
कारण तुम्ही तेच असता... मात्र, 
आतून कुठे काहीतरी तुटताना जाणवते. 
वाटेवरची झाडे मागे पडावीत तशी, 
एक-एक माणसे मागे पडत जातात. 
अंधाऱ्या रात्री चांदण्याने सोबत करावी, 
तशा आठवणी सदैव साथ करतात.

नवीन जागा,लोक अन् नवीन उत्साह,
नव-नवीन सगळीच नवलाई...
जेव्हा नव्याने कुणीतरी प्रशंसा करणार, 
ते शब्द बोलणारा जुना सखा मात्र आठवणार.!
एखाद्या टोमण्याचा राग येण्या ऐवजी, 
तसेच बोलणारा जुना दोस्त आठवणार..! 

काय घडतं तुम्ही एक गाव सोडता..? 
जागा आणि जग ही बदलत गेले... 
तरी आठवणींची नाळ तुटत नाही, 
सुटला गाव जरी, नातं तुटत नाही..!
©सचिन नानासाहेब खैरनार

Sunday, 6 June 2021

निःशब्द संवाद..!!

गजबजलेल्या वाटेवर निःशब्द उभा,
बाहेरून हा अनोळखी गराडा
पण आतून मात्र एकटाच..
हा निःशब्द संवाद स्वतःलाच धीर देईल
हा नीरव धाडस पण देईल
तुला बाहेरचा दबाव पेलण्यासाठी.
निःशब्द म्हणजे आत्म्याचे रुदन,
एकाकी मुकाट आर्त 
जी एकदिवस उफाळून बाहेर पडते,
हा एकांत नजरेस अशी नजर देतो,
जणू या जगात फक्त दोघेच....
तू आणि हा एकांत...
निःशब्द असणे पण एक भाषाच...
भाषा ...जी एकमेकांना शब्दाविना समजून घेते...
फक्त डोळ्यात पाहून....
आणि निःशब्द राहून...
©सचिन नानासाहेब खैरनार

Thursday, 4 February 2021

तू अन् मी...!

तू खळखळणारा झरा प्रिये,
अन् त्यावरचा मी सांकव° गं.

होतील अडथळे पार प्रिये,
थोडा तू संयम दाखव गं.

तू अविरत वाहती धारा प्रिये,
मी सोबतीचा किनारा गं.

पार करू या सागरा प्रिये,
अन् शोधुया दिप- मनोरा°° गं.

तू रेशीम तार मखमली प्रिये,
अन् साधा मी खादी कॉटन गं.

गुंफुनी हाती हात प्रिये,
विनू आयुष्याचं साटन• गं.

तू लख्ख उगवती दिशा प्रिये,
मी दिशाहीन रुक्ष•• वारा गं.

दे मावळतीला हात प्रिये,
होऊ एकमेका सहारा गं.
©सचिन नानासाहेब खैरनार.

°सांकव= ओढ्यावरचा अरुंद लाकडी पूल.
°°दीप = मनोरा= प्रकाश गृह(lighthouse)
•साटन= मखमली कापड, satin.
••रुक्ष= कोरडा.

Wednesday, 9 December 2020

पुणेरी माणुसकी..?

केरळ ते कोथरूड 
(माणुसकी व्हाया जनावर...)
*द्या थोडा वेळ आपल्यातला माणूस जागवण्या साठी आणि जगवण्या साठी.लेखन थोडे मोठे असल्याने कंटाळवाणे वाटल्यास क्षमस्व.

 काही दिवसा पूर्वी मल्याळम भाषेतील एक उत्कृष्ट चित्रपट पाहिला.(दिग्दर्शक लिजो जोस पेलीसरी यांचा हा चित्रपट या वर्षी ऑस्कर साठी भारताचे प्रतिनिधित्व करत आहे) मनाला चटका लावून जाणारा आणि बरेच संदेश देणारा. "जलिकट्टू".
एकप्रकारे मांसाहाराच्या व्यसनात लिप्त झालेल्या गावातील ही गोष्ट.
पूर्ण गावाला मांस पुरवणाऱ्या खाटिकाच्या तावडीतून मुक्त होऊन एक जनावर(रेडा) जीव वाचवण्यासाठी रानात धाव घेतो.
आणि सगळा गाव त्याच्या मागावर दिवस- रात्र एक करून तुटून पडतो. गट -तट पडून "ज्याच्या हाती ससा तो पारधी" किंवा "जीसकी लाठी उसकी भैस" असे ठरवून माग काढत सगळे जंगल तुडवत फिरतात.वाद शिगेला जाऊन काही लोक आपापसात भांडून मरतात, तर काही त्या जीव वाचवत फिरणाऱ्या जनावराच्या हल्ल्यात....शेवटी ते जनावर त्यांना चिखलात रुतून अडकल्या मुळे हाती येणार अशी परिस्थिती निर्माण होते.पण तो पर्यंत प्रत्येकात अती हव्यास जागा झालेला असतो आणि प्रत्येक जण एक जनावर होऊन एकमेकावर तुटून पडतो.
कसायाच्या दावणीतून सुटून त्या जनावराला एक रात्र जीवन जास्त मिळते,मात्र गावातील एकूण- एक माणसात एक जनावर जागा होऊन एक मुके जित्रब आणि सोबत माणुसकी पण संपलेली पाहायला मिळते.

आता वळूया शीर्षकाकडे...
आज सकाळी सहज फेसबुक वर वाचण्यात आले की एक गवा (बैलाची एक धिप्पाड जात)पुण्यात कोथरुड मध्ये माणसांच्या वस्तीत शिरला....
क्षणात जल्लीकट्टू चित्रपट डोळ्या समोरून गेला....
मनात शंका आली...याचाही तसाच दुःखद अंत झाला तर...?
पण परत माणुसकी वरचा विश्वास आतून ग्वाही देऊ लागला....
असं काही होणार नाही....
चित्रपटात माणुसकी मेली असेल पण पुण्यात ती मरेलच असे नाही...
कामात व्यस्त झालो आणि विसरही पडला....
आणि संध्याकाळी परत एका मित्राच्या टाईम लाईन वर पाहून काळीज पिळवटून निघाले...
आणि आपला माणुसकी वरचा विश्वास किती फोल किती बेगडी होता याची जाणीव झाली.

माणसाच्या वस्तीत शिरण्याची शिक्षा त्याला सुशिक्षित समाज म्हणून मिरवणाऱ्या माणसाने दिली होती. एकाही माणसाला इजा न करता तो प्राण गमावून बसला...
मृत्यू दंड देऊन....

माणूस कितीही प्रगत झाला...कितीही सुशिक्षित झाला...अगदी स्वतःला विद्देच्या माहेर घर म्हणवणाऱ्या शहरात वाढला....तरी...तरी त्याच्या आतला जनावर इतर कोणत्याच जनावराचे अकांत एकु शकत नाही...!

जनावर म्हणून त्याचा जीव घेतांना त्यातल्या एकाला तरी आपल्यातला जनावर दिसला असेल का..?

©सचिन नानासाहेब खैरनार
०९/१२/२०२०